10th OCTOBER 1937 ANANT BHAVE - TV ANNOUNCER
भावुककाका
बालसाहित्य हा सर्वात कठीण साहित्य प्रकार. ज्यांच्यासाठी आपण लिहिणार असतो अशा मुलांना वाचनात अजिबात रुची नसते, त्यांच्या जाणीवाही शब्द पकडण्यासाठी स्थिरावलेल्या नसतात. म्हणूनच अस्थिर पण उत्साही कारंजे असलेल्या लहान मुलांसाठी काही लिहिणे आणि त्यांनी ते वाचणे किंवा त्यांना ते वाचून दाखवण्यापर्यंत त्यांनी स्थिर राहाणे, हे जगातील आठवे आश्चर्य म्हणावे लागेल. अशा लहान मुलांसाठी काहीबाही लिहावे, असे ज्यांना आतून वाटते तो बालसाहित्यिक. अशा वेळी काय लिहावे आणि काय लिहू नये, हे ज्याला समजते त्याला बालसाहित्य उमगते. मुलांना आई-वडील, आजी-आजोबा आणि क्वचित प्रसंगी काका, मामा गोष्टींच्या रूपाने जगाची, जगाच्या व्यवहाराची ओळख करून देतात. त्याचबरोबर काही ठरावीक वाहिन्या मुलांसाठी ‘वाहिलेल्या’ आहेतच. पण, त्या मुलांना गोष्टी सांगतात, आई-वडिलांसारखे समजवत नाहीत किंवा त्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्नही ऐकून घेत नाहीत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनंत भावे हेही मुलांशी त्यांच्या साहित्यातून संवाद साधणारे भावेकाका आहेत. भारतीय भाषांमध्ये साहित्य निर्मिती करणा-या साहित्य अकादमीतर्फे त्यांना अलीकडेच बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला, तो त्याच संवादासाठी. मुलांना भावणा-या, समजणा-या शब्दांचा ताल, सूर, लय त्यांच्या कवितांमधून, गोष्टींमधून उमटत राहतो. मुले खेळताना, गाताना, खाताना या गोष्टी ऐकतात. त्यांना सर्व गोष्टी समजतातच असे नाही. पण गोष्टींचा, कवितांचा नाद स्पष्ट-अस्पष्टपणे शब्दांमधून ऐकू येतो. भावेकाकांच्या भावुकपणातूनच त्यांच्यातील बालसाहित्यिक जन्माला आला आहे. हे भावुक असणे त्यांनी शब्दांतून मांडले. सत्तरी गाठलेल्या, प्राध्यापिकी केलेल्या, दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून काम केलेल्या भावेंनी सामाजिक चळवळीतही काम केले. मात्र, दुनियादारीचे वास्तव उघडया-नागडया स्वरूपात पाहिल्यानंतरही जाणिवांची गाठोडी कायम भावुकच राहिली. साठीनंतर माणूस लहान होतो, असे म्हणतात. पण, वास्तव पाहिलेला आणि भोगलेला माणूस लहान होतो, खेळकर होतो. पण, मुलांसारखा निष्पाप, निष्कलंक होत नाही. पण, बालसाहित्यिक होतो. एकाच घरात, एकाच वर्गात, एकाच बाकावर बसलेल्या मित्रासारखा तो खांद्यावर हात ठेवून कविता म्हणतो, गोष्टी सांगतो. भावेंचे साहित्य हे असेच आहे. आचार्य अत्रे, विंदा करंदीकर यांच्यासह दिलीप प्रभावळकर, ‘गंमत शाळे’चे राजीव तांबे यांनी अत्यंत प्रभावीपणे मुलांच्या निष्पापपणाला स्पर्श केला. स्वत:मधील त्या निष्पाप आणि निष्कलंक मुलाला शोधून त्याच्याकडून कविता, गोष्टी लिहून घेतल्या. ‘प्रहार’च्या ‘किलबिल’साठीही त्यांनी लिखाण केले. बालपण कधीही न विसरणा-या आणि बालपणाला समृद्ध करणा-या प्रत्येक व्यक्तीला म्हणूनच भावे स्पर्श करू शकले. ‘कासव चाले हळूहळू’, ‘चिमणे चिमणे’, ‘अज्जब गोष्टी-गज्जब गोष्टी’ टंगळ-मंगळ’ असे असंख्य बालसाहित्य म्हणूनच निर्माण झाले. आयुष्य भरभरून जगल्यानंतर एका शांत, निवांत क्षणी आयुष्याकडे पुन्हा मागे वळून पाहिल्यानंतर फक्त बालपण आठवते आणि मग ते बालपण पुन्हा समोरच्या मुलांमध्ये हुबेहुब झळकते. या बाल्यावस्थेचा ठाव प्रत्येक बालसाहित्यिक घेतो. भावेंनी तो ‘आपल्या’ मुलांसाठी घेतला आहे.

Tags: anant bhave | अनंत भावे | बालसाहित्य | भावेकाका
No comments:
Post a Comment